ऐरोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी


समाजोपयोगी उपक्रम व भीम गीतांनी रंगला कार्यक्रम

नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ५ येथे अशोका प्रतिष्ठान आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तीन दिवसांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. 

कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, स्वच्छता मोहीम, महिलांसाठी मार्गदर्शन सत्र आणि विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. सांस्कृतिक सायंकाळी ढोल-ताशा, भीम गीतांचे सादरीकरण, तसेच काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नगरसेवक अंकुश सोनावणे आणि हेमांगी सोनावणे यांनी आयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या सुसंघटित नियोजनामुळे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले. या वेळी खासदार. नरेश म्हस्के  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करत कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

यावेळी खासदारांनी नगरसेवक अंकुश सोनावणे यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांना कंडोनियमशी संबंधित समस्या, सिडको व मनपातील समन्वयाचा अभाव, त्रिपक्षीय करारासंबंधी अडचणी याविषयी खा. म्हस्केंनी माहिती दिली. तसेच या प्रश्नांवर लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन देखील खासदारांनी दिले. 


सांस्कृतिक कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. 

कार्यक्रमास जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, मनोज हळदणकर, महिला आघाडी शहरप्रमुख शितलताई कचरे, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post