नगरसूल रेल्वे स्थानकावर 'कव्हर्ड गुड्स शेड' उभारणीस लवकरच सुरुवात

 


शेतमाल आणि खतांचे होणार संरक्षण

येवलायेवला मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे नगरसूल रेल्वे स्थानकावर ‘कव्हर्ड गुड्स शेड (Covered Goods Shed)’ उभारण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. या सुविधेचा लाभ शेतमालाची सुरक्षित साठवणूक तसेच खतांची थेट आवक सुनिश्चित होण्यास होणार असून, बिगरमोसमी पावसामुळे होणारे नुकसान टाळता येणार आहे.

नगरसूल हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील महत्त्वाचे स्थानक असून, दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या येथूनच मार्गस्थ होतात. येथील रेल्वे वाहतुकीचा विचार करता, शेतकरी व खत विक्रेत्यांच्या हितासाठी ‘कव्हर्ड गुड्स शेड’ ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

याआधीच नगरसूल येथे खतांचा ‘रेक पॉइंट’ मंजूर करण्यात आला होता. मात्र, शेडअभावी बिगरमोसमी पावसात खतांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने, खत कंपन्यांनी रेक उतरवण्यास कचरटपणा दाखवला होता. यामुळे खतांची आवक मनमाड व नांदगाव स्थानकांवर वळवली जात होती आणि तेथून रस्तामार्गे येवला व परिसरात आणावी लागत होती. परिणामी शेतकऱ्यांना खत वाढीव दराने खरेदी करावे लागत होते.

दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. अरुणकुमार जैन यांना सादर केलेल्या पत्राद्वारे या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला होता. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारने नगरसूल येथे ‘कव्हर्ड गुड्स शेड’ मंजूर केला असून, याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व महाप्रबंधक अरुणकुमार जैन यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. या शेडमुळे आता खतांची थेट आवक येवला तालुक्यात होणार आहे. तसेच परिसरातील कांदा, मका आदी शेतमालाची सुरक्षित साठवणूक करता येणार असून, शेतीविषयक नुकसान मोठ्या प्रमाणात टळणार आहे.

दरम्यान, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक प्रदीप कामले यांनी नगरसूल स्थानकास भेट देऊन शेडसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post