अंबरनाथमध्ये बेकायदेशीर वृक्षांची कत्तल


अंबरनाथ \ अशोक नाईक : एक हजार वर्ष पुरातन प्राचीन कालीन शिवमंदिराच्या वारसाने परिसरातील घनदाट जंगल संपदा हळूहळू मानवी आक्रमणामुळे नष्ट होऊ लागली आहे. त्यात अस्तित्वात असलेल्या झाडांची देखील दिवसाढवळ्या एकायदेशीर कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ पूर्व आनंदनगर एमआयडीसीमध्ये समोर आला आहे.


अंबरनाथ पूर्व भागातील आनंद नगर एमआयडीसी परिसरात बदलापूर-काटई राज्यमार्गालगत असलेल्या सुदामा हॉटेलच्या मागे असलेल्या एका प्लॉटमध्ये शनिवारी सकाळी बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू होती, दरम्यान झाडे तोडण्याची परवानगी घेतली आहे का?  अशी विचारणा करणाऱ्या नागरिकांना वृक्षतोड करणाऱ्या लोकांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाचे निरीक्षक जितेंद्र केदारे यांना विचारले असता संबंधित ठिकाणी वृक्षतोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच कत्तल झालेल्या झाडांचा पंचनामा करून बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार नियमाप्रमाणे कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती केदारे यांनी दिली. 



दरम्यान अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी परिसरातअस्तित्वात  असलेल्या झाडांची हळूहळू मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कत्तल केली जात असल्याने एमआयडीसीतील हरित पट्टा राखून ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? दिवसाढवळ्या कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याने यामागे कोणत्या बड्या नेत्यांचा वरदहस्त आहे का? अशी चर्चा रंगून राहिली आहे. मात्र अशा प्रकारे बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये देखील नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करणार की राजकीय दबावापोटी 'तेरी भी चूप मेरी भी चूप' राहणार आहे का ? हे आता पहावे लागेल.




Post a Comment

Previous Post Next Post