काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास जोशींची मागणी
अंबरनाथ \ अशोक नाईक : रस्त्यांच्या कामाची निविदा निघालेली असताना संबंधित ठेकेदाराने गेल्या एक वर्षा पासून रस्त्यांचे काम केले नसल्याने नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अश्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची कोणतीही निविदा स्वीकारण्यात येऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विलास जोशी यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे केली आहे.
अंबरनाथ पश्चिम प्रभाग क्रमांक २३ मधील संजयनगर येथे नगरपालिकेच्या वतीने २०२४ साली रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाची निविदा काढण्यात आली होती. सदर निविदा दिशा कंट्रक्शन कंपनीने २७ टक्के कमी दराने भरली होती. त्यामुळे या ठेकेदाराने नगरपालिकेकडे २७ टक्के कमी दराची अतिरिक्त अनामत रक्कम भरणे अपेक्षित होते. मात्र संबंधित ठेकेदाऱाने अनामत रक्कम भरलेली नाही. मात्र या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई होणे अपेक्षित असताना पालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट निविदा पुन्हा नव्याने काढली आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा आरोप माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी केला आहे.
मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, दिशा कंट्रक्शन कपंनीला काळ्या यादीत टाकून त्यांची कोणतीही निविदा स्वीकारू नये, अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणला बसण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही,असा इशारा विलास जोशी यांनी दिला आहे. दरम्यान या बाबत मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिशा कंट्रक्शन कपंनीची निविदा रद्द करुन नवीन कामाची निविदा काढली असल्याचे समजते. निवेदनाची प्रत कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यानाही देणार असल्याचे सांगितले.