बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शांतीचा जागतिक संदेश
नागार्जुनसागर ( तेलंगणा ) : भारताच्या समृद्ध बौद्ध वारशाचे दर्शन घडवत, २०२५ च्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील २२ देशांतील स्पर्धकांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिवशी तेलंगणातील ‘बुद्धवनम’, नागार्जुनसागर येथील ऐतिहासिक बौद्ध धरोहर स्थळाला भेट दिली. शांती, करुणा आणि आत्मज्ञानाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सौंदर्य आणि आध्यात्म यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
या खास दिवशी बौद्ध भिक्षूंनी घेतलेल्या ध्यान सत्रात मिस वर्ल्ड स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांनी बुद्ध मूर्ती, प्राचीन स्तूप, शिलालेख यांचं अभ्यासपूर्वक दर्शन घेतलं. विविध देशांतील स्पर्धकांनी भारतीय पारंपरिक पोशाखात सहभागी होऊन भारताच्या संस्कृतीप्रती आपला आदर व्यक्त केला. याशिवाय, ‘शांती आणि सहिष्णुता’ या संकल्पनांवर आधारित चर्चासत्रातही त्यांनी सहभाग नोंदवला.
नागार्जुनसागर धरणाच्या परिसरात वसलेलं ‘बुद्धवनम’ हे ठिकाण प्राचीन भारतातील बौद्ध परंपरेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे महायान बौद्ध परंपरेचे प्राचीन अवशेष, अशोककालीन शिल्पकला, विविध बौद्ध देशांतील स्थापत्यशैलींचं प्रतिकात्मक दर्शन आणि ध्यानस्थळे पाहायला मिळतात. हे ठिकाण केवळ पर्यटन केंद्र नसून, अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीचे जीवंत प्रतीक ठरले आहे.
मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजकांनी या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “बुद्धवनमसारखी ठिकाणं केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगासाठी शांतीचा संदेश देतात. सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नसून, अंतर्मुख होऊन आत्मशुद्धीचा अनुभव घेणंही तितकंच गरजेचे आहे.” या भेटीद्वारे सौंदर्य स्पर्धेला केवळ ग्लॅमरचे नव्हे तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सांगता शांती प्रार्थनेने आणि बहुधर्मीय सहिष्णुतेच्या घोषणांनी झाली. विविधतेतून एकता आणि सौंदर्याच्या माध्यमातून शांतीचा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे व्यक्त झाला. भारताची ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना या प्रसंगामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली.