पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत येत्या जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहेत.
बारावीच्या लेखी परीक्षा २४ जूनपासून सुरू होऊन १६ जुलैपर्यंत चालतील. याशिवाय प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा २४ जून ते ११ जुलैदरम्यान होतील. दहावीच्या लेखी परीक्षा २४ जूनपासून सुरू होऊन ८ जुलैपर्यंत चालणार असून, याच कालावधीत प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होतील.
दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यशिक्षण विषयांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा २४ जून ते ४ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. बारावीमधील माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने १५ आणि १६ जुलै रोजी होणार आहेत.
हे संपूर्ण वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) २२ मे पासून उपलब्ध आहे. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी हे वेळापत्रक डाउनलोड करून सूचना फलकावर लावणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेली माहिती ग्राह्य धरू नये, असा स्पष्ट इशारा मंडळाने दिला आहे.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. वेळापत्रकाची प्रत सर्व विभागीय कार्यालये आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.