उल्हास नदीत भरावाप्रकरणी १० कोटींचा दंड


सत्संग विहार संस्थेला ७ दिवसात दंड भरण्याचे आदेश

अंबरनाथ \ अशोक नाईक: उल्हास नदी प्रवाहित रेषो परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मानवी आक्रमण, अनधिकृत बांधकामे आणि सांडपाणी प्रदूषणाचा विळखा पडत असताना बदलापूर हेंद्रेपाडा येथे मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून उल्हास नदीपात्र बुजवणाऱ्या 'सत्संग विहार'संस्थेला अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाने १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठवला आहे. नोटीस बजावल्यापासून येत्या ७ दिवसात दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी दिले आहेत.

उल्हासनदी पात्रात ८,९१२ ब्रास मातीचा भराव

अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाने केलेल्या पंचनाम्यानुसार सत्संग विहार संस्थेने उल्हास नदी पात्रात ८,९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड व ८३ ब्रास दगड पावडर इतका भराव अनधिकृतपणे टाकला आहे. त्यामुळे या गौण खनिजाचा ९ कोटी ९३ लाख ६७ हजार १४१ रुपये इतका दंड आकारला असून यंत्रसामग्रीचा जातमुचलता म्हणून २२ लाख ५० हजाराची रक्कम भरावी लागणार आहे.



बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात पश्चिम भागातील हेंद्रेपाडा येथील 'सत्संग विहार' या संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे उल्हास नदीचे प्रवाहित पात्र बदलले आहे. असा दावा पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱ्या 'वनशक्ती' या संस्थेने केला आहे. दरम्यान याविरुद्ध स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. नदीपात्रात सपाट जमीन तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप होता. त्यानंतर या प्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पर्यावरण प्रेमींच्या रेट्यानंतर याप्रकरणी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाने पंचनामा करून दंडात्मक कारवाईचे आदेश काढले. त्यानुसार दंडाची रक्कम मुदतीत शासनाच्या खात्यात जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ ते तरतुदीनुसार दंड शक्तीने वसूल केला जाईल असा समज इशाराही देण्यात आला आहे. तरी या आदेशाविरुद्ध अपील करायचे असल्यास उल्हासनगर उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात आदेशाच्या दिनांक पासून ३० दिवसाच्या आत कपिल दाखल करण्याची तरतूद आहे.


Post a Comment

Previous Post Next Post