अंगावर असूडाचे फटके मारत, डफडे, सारंगी ढोलक वाजवत नाथपंथींचा आक्रोश
अंबरनाथ \ अशोक नाईक : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही अनेक समाज घटकांची भटकंती थांबलेली नाही. अशीच भटकंती अंबरनाथ मधील ५३० नागपंथी डवरी गोसावी कुटुंबावर आली आहे. गेले अनेक वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथमधील नाथपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संघ व राजे उमाजी भटके विमुक्त आदिवासी इतर मागासवर्गीय संघटना यांचे वतीने भटक्या समाजाच्या विविध मागण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
अंबरनाथमधील सर्कस मैदान येथील ५३० कुटुंबाचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, घरांना टॅक्स लागू करण्यात यावा, या ठिकाणी पायवाटा तयार करण्यात याव्यात, पाणी आणि लाईटची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यासाठी नागपंथी डावरी गोसावी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले, राजे उमाजी भटके समाजाचे अध्यक्ष कैलास भंडालकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. सर्कस मैदान येथून निघालेल्या मोर्चात पोतराज उघड्या अंगावर असुडाचे फटके मारत चालले होते. तर गोंधळी सामाजचे लोक डफडे वाजवत, महिला काठीने ढोलक वाजवत तर सारंगीवाले सारंगी वाजवत मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नाथपंथी डवरी गोसावी यांच्या मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, रिपाई महाराष्ट्र राज्य सह सचिव राहुल हंडोरे, समाजसेवक सिद्राम कांबळे, पोतराज समाजाचे नेते दादू पोतराज, साहिनाथ पोतराज, गोंधळी समाजाचे दत्ता चव्हाण, सारंगीवाले पटलाजी राठोड, महिला प्रतिनिधी अंजम्मा, शान्तम्मा, द्वारका हजारे, भटक्या समाजाचे सुनील सकट, ओगले, पळसपगार, भालेराव आदी. कार्यकर्ते मोर्चात सामील झाले होते. यावेळी ७ दिवसाच्या आत भटक्या समाजाचे प्रश्न सोडविले जातील. असे लेखी आश्वासन अंबरनाथ नगरपालिकेमार्फत देण्यात आले.