पूर्वीच्या वादातून खोटे आरोप? न्यायालयात युक्तिवाद प्रभावी!
कागल : कागल पोलीस ठाणे हद्दीतील एका ग्रामपंचायतीतील प्रमुख महिला अधिकाऱ्याने पिंपळगाव खुर्द येथील एका इसमाविरोधात पाठलाग, अश्लील हावभाव व जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, अशा स्वरूपाची तक्रार दिनांक १५ मे रोजी दाखल केली होती. यानंतर कागल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ७९ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. भारत अनिल सोनुले यांनी अटकपूर्व जामीनासाठी मे जिल्हा न्यायाधीश क्र. २, कोल्हापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी सरकारी पक्षाने जामीन अर्जाला जोरदार हरकत नोंदवली. मात्र, आरोपीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या महत्वाच्या २७ कागदपत्रांमुळे आणि फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दिनांक २२ मे २०२५ रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या सुनावणीदरम्यान आरोपीच्या बाजूने ॲड. भारत सोनुले यांनी युक्तिवाद केला. तसेच ॲड. सतीश वाय. कुंभार, ॲड. सरोज कृष्णा देसाई, ॲड. प्रीती श्रीपती देवर्डेकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
“सत्यमेव जयते”ची पुनःप्रतीती — न्यायालयाचा वस्तुनिष्ठ निर्णय!
"पूर्वीच्या वादातून आणि वैयक्तिक द्वेषातून काही वेळा तथ्यहीन आरोप लावले जातात. व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी गुन्हे दाखल केले जातात. अशा वेळी कायद्याचा दुरुपयोग होतो. मात्र, पुरावे व कायदेशीर जागरूकता असल्यास न्यायालय वस्तुनिष्ठ निर्णय घेते. या प्रकरणात न्यायालयाने कागदत्रांद्वारे आधारित निर्णय देत आरोपीचा जामीन मंजूर केला. हा निर्णय ‘सत्यमेव जयते’ या तत्त्वाला अधोरेखित करणारा ठरला."
— ॲड. भारत अनिल सोनुले