आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली गवळीदेव पर्यटनस्थळ विकासकामाची प्रत्यक्ष पाहणी
नवी मुंबई : सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाणारे आधुनिक नवी मुंबई शहर पर्यटनदृष्ट्याही आकर्षण केंद्र व्हावे या अनुषंगाने घणसोली विभागात एमआयडीसी भागात असलेला डोंगरावरील गवळीदेव परिसर नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. या कामाची नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना तेथील नैसर्गिक सौंदर्याची जपणूक करुन उत्तम दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. यशवंत कापसे व संबधित अधिकारी आणि वास्तुविशारद व कंत्राटदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दक्षिणोत्तर पसरलेल्या नवी मुंबईच्या पूर्वेकडील सहयाद्रीच्या डोंगर रांगामध्ये घणसोली विभाग कार्यक्षेत्रात असणारे गवळीदेव हे पारंपारिक स्थान पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. विशेषत्वाने पावसाळी कालावधीत याठिकाणी नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील उत्साही पर्यटक मोठया प्रमाणावर भेट देतात. त्यामुळे आधीच लोकप्रिय असणाऱ्या या पारंपारिक स्थळाचा नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास नागरिकांना पर्यटनासाठी एक चांगले स्थळ उपलब्ध होईल या भूमिकेतून गवळीदेव परिसराचा विकास करण्यात येत आहे.
याकरिता वन विभागाकडून सुशोभिकरण करण्याकरिता १० हजार चौ.मी. आकाराचे क्षेत्र हस्तांतरित करण्यात येत आहे. या विकास कामाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत ५ कोटी रक्कमेचा निधी मंजूर झाला आहे. सदर पर्यटन स्थळ विकासाचे काम गतीमानतेने करण्यात येत आहे. यामध्ये - पेविंग स्टोनचे पदपथ बांधणे, गजेबो बांधणे, पोर्टा शौचालय बांधणे, दगडी बांधकाम करणे, गॅबियन वॉल बांधणे, पिचींग करणे, दिशादर्शक फलक पुरविणे, विद्युत विषयक कामे करणे, जलवाहिनी टाकणे अशा विविध कामांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत गॅबियन वॉल बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून २५% काम पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी करतांना तसेच नियोजित कामाचा नकाशासह सविस्तर तपशील जाणून घेतल्यानंतर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याठिकाणी कृत्रिम दगड न वापरता उपलब्ध असलेले नैसर्गिक दगड वापरण्यात यावेत अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे या पर्यटनस्थळी जाण्याकरिता आवश्यक पाय-या बनविण्यासाठी व पदपथासाठी खोदकाम करुन बनविण्यात येणा-या पायाच्या दोन्ही बाजूला पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पावसाळयापूर्वी कच्चा नाला त्वरित बनविण्यात यावा असेही आयुक्तांनी निर्देशित केले. पर्यटनस्थळी भेट देणा-या नागरिकांकरिता ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी व स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
गवळीदेव पर्यटनस्थळ हे तेथे उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करुन विकसित करावे व नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने वेळ घालविण्यासाठी व विरंगुळा मिळवून देण्याकरिता आवश्यक सर्व सुविधा देऊन हे पर्यटन स्थळ नवी मुंबई शहराच्या नावलौकिकाला साजेशा स्वरूपात विकसित करावे अशा सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाहणी दौ-याप्रसंगी दिल्या.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #navimumbaimahanagarpalika ##drkailasshinde