ठाणे पालिका प्रशासन सज्ज ; कळवा रुग्णालयात १० खाटा
ठाणे : शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून, मागील तीन दिवसांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात १० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सुदैवाने हे सर्व रुग्ण सौम्य लक्षणांनी बाधित असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता ठाणे महापालिकेने शहरातील प्रमुख रुग्णालयांत उपचार व विलगीकरणासाठी विशेष तयारी केली आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार, आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० खाटांचे विशेष कोविड कक्ष तयार करण्यात आले असून, ऑक्सिजन सुविधांसह प्राथमिक उपचार देण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
राजीव गांधी वैद्यकीय रुग्णालय (काळवा नाका) येथे सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे लसीकरण, तपासणी व सल्लागार सेवा उपलब्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (लोकमान्य नगर) येथे ताप, सर्दी-खोकला यांसारख्या लक्षणांसाठी तपासणी केंद्र सुरू असून, येथे दररोज RT-PCR व अँटिजेन चाचण्या घेतल्या जात आहेत.
दरम्यान, राज्यभरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये नवीन रुग्ण आढळत असून, राज्यात एकूण रुग्णांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. राज्य सरकारकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने रेमडेसीविर, ऑक्सिजन सिलिंडर व औषधसाठा पुरेसा राखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांशीही समन्वय साधून तात्काळ उपचारासाठी बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कोणतीही भीती न बाळगता, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, गर्दी टाळणे, स्वच्छता राखणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करणे हे अत्यावश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.