सैनिकांच्या शौर्याला सलाम
पाचोरा : भारताच्या सीमांवर देशासाठी झुंजणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करत ‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत पाचोऱ्यात भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेचे आयोजन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
ही तिरंगा रॅली रविवार, २५ मे रोजी सकाळी ९.०० वाजता भारत डोंगरी स्टॉप येथून सुरू होऊन कृष्णापुरी, आठवडे बाजार, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हुतात्मा स्मारक येथे समारोप करण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
या तिरंगा यात्रेत प्रशासनातील अधिकारी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी तयारी पूर्ण झाली असून, वातावरण देशभक्तीमय झाले आहे.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भारतीय लष्कराने पाकिस्तान व दहशतवादाविरोधात धैर्याने कारवाई करत देशाची मान उंचावली आहे. या नव्या पिढीने नव्या जिद्दीने कामगिरी करत खरेखुरे शौर्य दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय सेनेने खऱ्या अर्थाने ५६ इंचांची छाती दाखवत पाकिस्तानला नमवले आहे. आपल्या सैनिकांनी देशाचे रक्षण करत अनेक जीवांचे बलिदान दिले असून, ही यात्रा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम आहे.