मालवण, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण रविवारी मोठ्या आनंदात आणि उत्साहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच सन्मानाने आणि आधीपेक्षा जास्त भव्यतेने उभा केलेला आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जेव्हा दुर्दैवी घटना घडली होती, तेव्हाच महायुती सरकारने हा पुतळा पुन्हा एकदा त्याच ठिकाणी विक्रमी वेळेत उभारण्याचा निर्धार केला होता. आज आम्ही सर्वांनी मिळून त्या पुतळ्याचे पूजन केले. हे काम विक्रमी वेळेत केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अधिकारी यांचे विशेष अभिनंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेला शिवपुतळा संपूर्णपणे कांस्य धातूपासून बनवण्यात आला असून, त्याची एकूण उंची तलवारीसह ९२ फूट आहे. हा पुतळा सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सुपुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला आहे.
या पुतळ्यात वापरण्यात आलेल्या कांस्य धातूमध्ये ८८ टक्के तांबे, ८ टक्के कथिल आणि ४ टक्के जस्त यांचा समावेश आहे. त्याच्या मजबुतीसाठी ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे, जो समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान व क्षरण यांना तोंड देण्यास सक्षम आहे. शिवाय, हा पुतळा २०० किमी/तास वेगाच्या वाऱ्याला देखील तोंड देऊ शकतो, असे तांत्रिक विश्लेषणात स्पष्ट करण्यात आले आहे.
राजकोट किल्ल्यावर याआधी ३५ फूट उंचीचा स्टीलचा पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र २६ ऑगस्ट २०२४ रोजी आलेल्या जोरदार वादळामुळे हा पुतळा कोसळला होता. या दुर्घटनेनंतर नव्या पुतळ्याच्या उभारणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आणि केवळ काही महिन्यांत नव्या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले.
या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. हा पुतळा त्यांच्या कार्याचे स्मरण करून देणारा भव्य सन्मार्गदर्शक ठरेल.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घडी ‘इतिहास जपणारी आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारी’ म्हणून गौरवली. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला हा पुतळा नवे पर्व देईल, असा विश्वास व्यक्त केला.
राजकोट किल्ला हा शिवकाळातील एक महत्त्वाचा सागरी दुर्ग आहे. त्यावर उभारलेला हा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी एक नवे आकर्षण ठरणार आहे. या ठिकाणी पुढील काही महिन्यांत संग्रहालय, माहिती केंद्र, लाईट आणि साउंड शो आदी सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू असून, यामुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.