नमस्कार
दहशतवादाविरुद्ध भारताच्या धडक कारवाईला जागतिक प्रतिसाद
नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी बुधवार, ७ मे रोजी पहाटे 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेंतर्गत पाकिस्तान सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर २४ उच्च-अचूक हल्ल्यांची समन्वित मालिका राबवली. गेल्या महिन्यात, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला थेट प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय स्तरातूनही प्रतिसाद मिळत आहे.
पहलगाम हल्ल्यात असंख्य लोकांचा (बहुसंख्य पर्यटक) बळी गेला आणि त्यातून देशभरात संतापाची लाट उसळली होती. भारताने बुधवारी पहाटे दिलेल्या चोख प्रत्युत्तराला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला. तसेच, 'हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल', असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही भारताच्या या प्रत्युत्तर कारवाईबाबत प्रतिक्रिया येत आहेत. हा आंतरराष्ट्रीय प्रतिसाद चिंता, सावधगिरी आणि परस्परविरोधी भूमिकांचे मिश्रण आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांची हीच भावना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही व्यक्त केली. दोन्ही देशांतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे रुबियो म्हणाले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी दोन्ही देशांना तणावाच्या परिस्थितीतून मागे हटण्याचे आवाहन केले. तर फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी एका मुलाखतीत नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित करत आणि पुढील युद्धजन्य परिस्थिती टाळण्याचे आवाहन केले. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी आणि 'युएई'चे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांनीही अशा परिस्थितीत राजनैतिक चातुर्य आणि संवाद हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे, यावर भर दिला.
सर्वसाधारण संयम बाळगण्याचे आवाहन करताना, काही राष्ट्रांनी अधिक कडक भूमिका स्वीकारली. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी भारताला निःसंदिग्ध पाठिंबा दर्शवला. पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्यांनी दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे प्रतिपादन केले. याउलट चीनने भारताच्या प्रत्युत्तरावर चिंता व्यक्त करत या कृतींचे 'खेदजनक' असे वर्णन केले, जे नापसंती दर्शवते. तर तुर्कीने पुढे जाऊन पाकिस्तानची बाजू घेतली आणि या हल्ल्यांना 'अकारण आक्रमकता' असे म्हटले.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्यांबाबत जागतिक दृष्टिकोन जोडला. तसेच दोन्ही बाजूंनी जास्तीत जास्त संयम बाळगण्याचे आवाहन केले. जगाला दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील संघर्ष सद्यस्थितीत परवडणार नाही, असा इशाराही गुटेरेस यांनी दिला. पाकिस्तानमधील कारवाईनंतर भारताने आपल्या राजनैतिक पातळीवर सक्रिय भूमिका घेतली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांच्याशी चर्चा केली.
त्याचवेळी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, युएई, जपान, रशिया, चीन आणि फ्रान्समधील त्यांच्या समकक्षांशी संवाद साधला, ज्यात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि युएईचे शेख तहनून यांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्यांना 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल माहिती दिली आहे.