संदीप पाचंगे यांची ठाणे महापालिकेला ठाम मागणी
ठाणे : मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या पाच ठेकेदार कंपन्यांना ठाणे महापालिकेच्या कोणत्याही प्रकल्पात सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केली आहे. त्यांनी ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्याकडे निवेदन सादर करून ही मागणी नोंदवली आहे.
मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याची माहिती समोर आली असून, यासंदर्भातील चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरू आहे. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गैरव्यवहारात अँक्यूट डिझाईनिंग, कैलास कन्स्ट्रक्शन, एन. ए. कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जे. आर. एस. इन्फ्रास्ट्रक्चर या पाच ठेकेदार कंपन्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात काही पालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग उघडकीस आला आहे.
या कंपन्यांनी गाळ उपसण्याच्या कामांमध्ये बनावट मोजमापे, खोटे दस्तावेज तयार करणे, आणि चुकीचे बिलिंग करणे अशा गंभीर त्रुटी केल्या असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अशा कंपन्यांना पुन्हा काम देणे म्हणजे जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी ठरेल. या कंपन्यांकडे ठाणे महापालिकेतील काही महत्त्वाची कामे देखील सुरू आहेत, आणि त्याही प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पाचंगे यांनी मागणी केली आहे की, या सर्व पाच कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, त्यांना कोणतेही नवीन ठेके दिले जाऊ नयेत, आणि त्यांच्या चालू असलेल्या कामांचे पुनरावलोकन व सखोल तपासणी करण्यात यावी. तसेच, संबंधित कामांचा दर्जा, प्रत्यक्ष कामाची व्याप्ती आणि त्यावरील खर्चाचे विवरण यांचीही पडताळणी करण्यात यावी.
"प्रशासनाने कठोर पावले उचलून या कंपन्यांचा काळाबाजार थांबवावा. अशा कंपन्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे नागरिकांच्या पैशांशी गद्दारी करणे होय," असे पाचंगे यांनी स्पष्टपणे सांगितले.