वाढलेल्या मतदारसंख्येचा काँग्रेसकडून बागुलबुवा


आमदार रवींद्र चव्हाण यांची जोरदार टीका

ठाणे : आधी १ कोटी, मग ७० लाख, त्यानंतर ३९ लाख... मतदारसंख्या वाढीवर काँग्रेसचे 'शहजादे' राहुल गांधी वाटेल तसे आकडे फेकत आहेत. मात्र ‘संविधान बचाव’ आणि ‘ईव्हीएम हटाव’ यासारखे ढोंगी अजेंडे जसे सपशेल फसले, तसाच 'वाढलेल्या मतदारसंख्येचा बागुलबुवा' सुद्धा फेल ठरेल, असा घणाघात करत भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि ठाणेचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडी व काँग्रेसवर चांगलाच हल्ला चढवला.

वाढलेल्या मतदारसंख्येचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ही अजेंडा राजकारणाची खेळी लोकांनी ओळखली असल्याचा ठाम दावा चव्हाण यांनी केला. राहुल गांधी आणि महाविकास आघाडीचे नेते सातत्याने मतदान यंत्रणेमध्ये संशय घेत 'लोकशाही धोक्यात' असल्याचे सांगतात, मात्र जनतेचा विश्वास भाजपवर अधिकाधिक वाढतच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चव्हाण यांनी भाजपच्या कार्यकाळातील विकासकामांची यादीही यावेळी मांडली. त्यांनी सांगितलं की, "देशात वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे धावत आहेत, मेट्रोचा विस्तार झपाट्याने सुरू आहे, औद्योगिक गुंतवणुकीमुळे रोजगार वाढले आहेत. हे सगळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शक्य झालं आहे. म्हणूनच जनतेने पुन्हा 'नरेंद्र-देवेंद्र' जोडीवर विश्वास दाखवला आहे."

"काँग्रेस गांधी घराण्याची गुलाम बनली आहे, तर राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा गट), तृणमूल हे फक्त घराणेशाही जोपासणारे पक्ष आहेत. ही 'फॅमिली बिझनेस' संस्कृती भारतीय मतदारांना आता मान्य नाही," असे ठाम मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

"लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी बूथपातळीवर मेहनत घेतली. संघटन, कार्यकर्ता व समर्थक यांचं नेटवर्क, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ, या सगळ्यांच्या जोरावर 'एक है तो सेफ है', 'हिंदू जागो तो' यासारखे संदेश जनतेपर्यंत पोहोचले. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर हरियाणा आणि दिल्लीसह अनेक राज्यांत भाजपची लाट उसळली," असेही त्यांनी सांगितले.


"मतदारसंख्या सगळीकडेच वाढली!"

रवींद्र चव्हाण म्हणाले, फक्त भाजप जिंकलेल्या मतदारसंघांतच मतदार वाढले, हा काँग्रेसचा खोटा प्रचार आहे. पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, पुण्याचा वडगाव-शेरी, मुंबईतील मालाड पश्चिम, मुंब्रा – या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले, तरीही मतदारसंख्या वाढली होती. मग अशा ठिकाणी राहुल गांधी काही बोलत नाहीत. ही निवडक टीका म्हणजे जनतेची फसवणूक आहे.

'मोहब्बत की दुकान' नव्हे, 'नफरत का मकान'

चव्हाण पुढे म्हणाले, राहुल गांधी 'मोहब्बत की दुकान' म्हणतात, पण त्यांची ही दुकानदारी म्हणजे खोटा नॅरेटिव्ह विकणारा 'नफरत का मकान' झाला आहे. देशात जिहादी फतव्यांच्या आधारे एकगठ्ठा मतदान केलं गेलं, हिंदूविरोधी शक्तींना काँग्रेस पाठीशी घालतेय, हे चित्र महाराष्ट्रासह देशभरातील मतदारांनी पाहिलं आणि त्याला विरोध म्हणून भाजपच्या मागे उभे राहिले.

राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका

"राहुल गांधींनी लोकसभा निवडणूक काळात 'संविधान बचाव' या नावाखाली खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण काँग्रेसने कधीही जिंकल्यावर ईव्हीएमवर दोष ठेवले नाही. मग हरले कीच का ईव्हीएम दोषी? काँग्रेसचा हा ढोंगीपणा महाराष्ट्राच्या जनतेला आता ठाऊक झाला आहे," अशी टीका करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेला चपराक दिली.



Tags : #MaharashtraPolitics #RavindraChavan #RahulGandhi #CongressVsBJP #मतदानसंख्या #ConstitutionNarrative #Election2025



Post a Comment

Previous Post Next Post