जळगाव जिल्हाधिकारी आणि आय. एम. ए डॉक्टरांची बैठक
जळगाव : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि व्यापक करण्याच्या दृष्टीने खासगी व सरकारी यंत्रणांमध्ये सहकार्य वाढविण्याचा हेतू यामागे होता.
या बैठकीत आरोग्य व्यवस्थेच्या विविध अंगांवर सखोल चर्चा झाली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित झाली, तर खासगी आणि सरकारी डॉक्टरांनी एकत्रितपणे संशोधन, क्लिनिकल ट्रायल आणि रोग सर्वेक्षणाच्या क्षेत्रात भागीदारी करावी, अशी मांडणी करण्यात आली. जिल्ह्यातील ओपीडी आणि फार्मसीमध्ये येणाऱ्या रुग्णांची माहिती वापरून आजारांचे ट्रेंड ओळखणे, ही नव्या यंत्रणेसाठी दिशा ठरू शकते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
डॉक्टरांनी एम. आर. आय आणि सी. टी. स्कॅनसारख्या महत्त्वाच्या सेवा २४ तास सुरू ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. बाल आरोग्याच्या दृष्टीने, NICU मधून डिस्चार्ज झालेल्या अल्पवजनी बाळांची RBSK योजनेअंतर्गत नियमित तपासणी आणि निगा राखली जावी, असा ठाम सूर उपस्थित डॉक्टरांनी मांडला.
बैठकीत बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन आणि MPCB प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली. तसेच PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी विशेष जनजागृती उपक्रम राबवले जावेत, असे सुचविण्यात आले. विशेष गरजा असलेल्या बालकांची वेळेत ओळख होऊन त्यांचा योग्य पाठपुरावा व्हावा यासाठी DEIC (जिल्हा अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर) चा अधिक प्रभावी वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारी व खासगी यंत्रणा एकत्र आल्यास जनतेला दर्जेदार, जलद आणि व्यापक आरोग्यसेवा देता येऊ शकते.” या चर्चेतून जिल्ह्यातील आरोग्यसेवा व्यवस्थेचा एक नवा, सशक्त आणि सहकार्ययुक्त आराखडा तयार होईल.