दहीहंडी विमाच्या नावाखाली योजनेत गोंधळ
दिवा / आरती परब : महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि एकतेचा प्रतीक असलेला दहीहंडी सण हा उत्साह, ऊर्जा आणि सामूहिक सहभागाने साजरा होणारा एक विशेष दिवस असतो. या सणाला धर्मवीर आनंद दिघेंनी सामाजिक ऐक्याचा आणि पराक्रमाचा रंग दिला होता. त्यांनी या सणाला केवळ उत्सव न राहता, युवकांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचे प्रतीक बनवले. आजही लाखो गोविंदा हा सण उर्जेने साजरा करतात. मात्र यावर्षी, सरकारच्या अपघाती विमा योजनेतील अडचणी आणि गोंधळामुळे सणाचा आनंद कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाने गोविंदांच्या सुरक्षेसाठी मोफत विमा योजना जाहीर केली आहे, हे स्वागतार्ह पाऊल असले तरी योजनेची प्रत्यक्षातली अंमलबजावणी अत्यंत किचकट आणि अडचणीत टाकणारी ठरत आहे. या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या फॉर्ममध्ये एकाच माहितीचा पुन्हा पुन्हा आग्रह, उदाहरणार्थ दोन वेळा मंडळाचे नाव, दोन मोबाइल क्रमांक, दोन ईमेल आयडी मागवले जात आहेत. या सगळ्या गोष्टी गोंधळ वाढवणाऱ्या आहेत. प्रत्येक माहिती अनिवार्य ठेवून, काही माहिती नसल्यास फॉर्म नाकारण्याची शक्यता असते, त्यामुळे ग्रामीण भागातील आणि लहान पथकांसाठी ही प्रक्रिया त्रासदायक ठरत आहे.
त्यातच सर्व गोविंदांची यादी व अर्ज मंडळाच्या लेटरहेडवर फक्त १ MB च्या पीडीएफमध्ये अपलोड करणे, ही तर हास्यास्पद अट वाटते. ग्रामीण भागातील मंडळांकडे तांत्रिक सुविधा कमी असताना, एवढ्या गुंतागुंतीच्या अटी लादणे म्हणजे या सणाच्या मूळ भावनांवर पाणी फेरण्यासारखे आहे. या योजनेचा निधी शासनाकडून येतो, तर अटी व नियम लादण्याचे अधिकार कोणत्या असोसिएशनला दिले गेले आहेत, हा खरा प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, “दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सण आहे, तो कोणत्याही बोगस नियमांच्या जोखडात अडकवू नका. गोविंदांचा विमा हा हक्क आहे, उपकार नाही. शासनाने तात्काळ या फॉर्ममधील गुंतागुंतीच्या अटी रद्द करून ओरिएंटल इन्शुरन्स कार्यालयात एक खिडकी योजना चालू करावी व सोपी प्रक्रिया लागू करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि शासन तसेच असोसिएशन जबाबदार राहतील.
दहीहंडीचा आनंद, गोविंदांची सुरक्षा आणि त्यांच्यावरील जबाबदारी ही शासनाची प्राथमिकता असावी. केवळ फॉर्मॅलिटीसाठी योजना जाहीर करून, प्रत्यक्षात गोविंदांना त्रास होईल अशी प्रक्रिया ठेवली गेली, तर त्या योजनांचा उपयोग शून्य ठरतो. धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा सन्मान राखत, हा सण पूर्वीप्रमाणे जल्लोषात आणि सुरक्षिततेत साजरा झाला पाहिजे, हीच जनतेची आणि गोविंदांची अपेक्षा आहे.