मराठी शाळांची दुरवस्था

Maharashtra WebNews
0

 


विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची अपेक्षा, पण शाळा मोडकळीस

डोंबिवली / शंकर जाधव :  २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांतील जिल्हा परिषद शाळांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. डोंबिवलीजवळील घेसरगावातील शाळा, तसेच उसरघर, संदप, काटई, निळजे व इतर गावांतील शाळांच्या इमारतींमध्ये गळकी छप्परे, मोडकी बाके, पंख्यांचा अभाव, तुटलेल्या भिंती अशा गंभीर समस्या आहेत. शाळा मोडकळीस आलेल्या असतानाही प्रशासन विद्यार्थ्यांकडून गुणवत्तेची अपेक्षा करत आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी उपस्थित केला.


घेसरगाव येथील शाळेची अवस्था इतकी खराब झाली आहे की विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही. या परिस्थितीत शिक्षण थांबू नये म्हणून सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक शिक्षणप्रेमी अ‍ॅड. शशिकांत काथोरे पाटील यांनी आपल्या घरी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जागा दिली आहे. याबद्दल मनसेतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वात उसरघर, संदप, काटई, निळजे व घेसर गावातील विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागाध्यक्ष प्रविण पाटील, संदीप म्हात्रे, शाखाध्यक्ष विनोद चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, माजी सरपंच क्रांती पाटील, महिला पदाधिकारी स्वप्ना पाटील, सामाजिक माध्यम प्रमुख प्रविण बोऱ्हाडे, तसेच अनेक स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उपजिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात शाळांची थोडीफार तरी देखरेख व्हायची. मात्र, पालिकेत समावेश झाल्यानंतर शाळांकडे पाठ फिरवली गेली. अनेक शाळांना दरमहा हजार ते दीड हजार रुपये वीज बिल येते, पण त्यांना मिळणारे वार्षिक अनुदान फक्त २०-२५ हजार रुपये इतकेच आहे. त्यातून वीजबिल, साहित्य खरेदी आणि इतर व्यवस्थापन अपेक्षित आहे. शिक्षकांची अवस्था अशी की ते मुलांना शिकवायचं की बिलं भरायचं असा प्रश्न निर्माण होतो.


मनसेच्या नेतृत्वात कल्याण ग्रामीणमधील सर्व शाळांचा अभ्यास करण्यात येणार असून, प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून शाळांच्या समस्यांबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात येणार आहे. "जर या शाळांकडे दुर्लक्ष केलं गेलं, तर मनसे प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही योगेश पाटील यांनी दिला.

"सर्व माजी व सध्याचे लोकप्रतिनिधींनी या शाळांकडे लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांचं शिक्षण घडवणं हे आपल्या हातात आहे," अशी भावनिक साद मनसेने या माध्यमातून जनतेला घातली आहे.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)