पालक सचिव विरेंद्र सिंह यांचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या आरोग्य सेवा उन्नतीच्या कामांचा सखोल आढावा घेताना जिल्ह्याचे पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी स्पष्ट निर्देश दिले की, क्रिटीकल केअर ब्लॉक (CCBH) हॉस्पिटलचे बांधकाम निश्चित मुदतीत आणि उच्च दर्जाने पूर्ण व्हावे.
या दौऱ्यात त्यांनी आयुष इमारत, क्रिटीकल केअर ब्लॉक (CCBH) आणि जिल्हा औषध भांडार या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण (MMRHA) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या जिल्हा औषध भांडारासाठी आवश्यक जागा जिल्हा मुख्यालयात उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिल्या. हे औषध भांडार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांना पुरवठा करणार आहे.
पाहणीदरम्यान सिंह यांनी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शासनाच्या आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. यानंतर त्यांनी आयुष इमारतीची पाहणी केली. सध्या या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय आणि काही आस्थापना कार्यरत आहेत. मात्र, इमारत पूर्णतः तयार असूनही रुग्णालयाचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही, याची त्यांनी नोंद घेतली.
त्यावर उपाय म्हणून सिंह यांनी अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि बांधकाम विभाग यांच्यासोबत चर्चा करून इमारतीचा काही भाग आयुष विभागासाठी वापरात आणावा आणि रुग्णालय त्वरित कार्यान्वित करावे, अशा सूचना दिल्या. याचवेळी AI सिंधुदुर्ग प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या दोन ॲप्लिकेशन्स, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे संकेतस्थळ आणि डॅशबोर्ड यांचे प्रात्यक्षिक सिंह यांना सादर करण्यात आले.
त्यांनी या डिजिटल आरोग्य उपक्रमांचे कौतुक करत, आरोग्य सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणी आणि बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णा चव्हाण, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी अधिकारी उपस्थित होते.