‘आपला दवाखाना’ ओस पडला; परिचारिकांचा पगार रखडला!



ठाणे :  शहरात नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी सुरू करण्यात आलेला ‘आपला दवाखाना’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सध्या पूर्णपणे ठप्प झाला आहे. या दवाखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहा-सहा महिन्यांचे पगार रखडले असून अनेक कर्मचारी बेरोजगार अवस्थेत आहेत.

या अन्यायाविरोधात संबंधित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याने त्यांच्या घरचा दिवाळीचा आनंदही हिरावला गेला आहे, ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाशी चर्चा करून त्वरित तोडगा काढण्याची ग्वाही आमदार केळकर यांनी दिली. ‘आपला दवाखाना’ उपक्रम राबवण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील मेडको (Medco) या कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र हे कंत्राट ऑक्टोबरपर्यंत वैध असतानाही ऑगस्ट महिन्यातच दवाखाने बंद करण्यात आले. त्याचवेळी कर्मचाऱ्यांचे पगारही थांबले.

प्रशासनाने या कंपनीवर ₹५६ लाखांचा दंड ठोठावला असल्याचे समजते, परंतु कंपनीने अद्याप त्याकडे कोणतीही दाद दिलेली नाही. त्यामुळे आमदार केळकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, कंपनीकडून दंडाची वसुली करून कर्मचाऱ्यांचे पगार त्वरित देण्यात यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे.

‘आपला दवाखाना’ ही योजना सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र दवाखाने बंद झाल्याने रुग्णांना उपचारांसाठी खाजगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागत असून ठाणेकर नागरिकांकडून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरिक आणि कर्मचारी दोघांच्याही हितासाठी ठाणे महानगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करून थकबाकी पगार मंजूर करावेत आणि ‘आपला दवाखाना’ पुन्हा सुरू करावा, अशी ठाम मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post