स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृतीसाठी महिलांना स्व-परीक्षण आणि तपासणीसाठी प्रेरणा
बंगळुरू : एचसीजी कॅन्सर सेंटर, बंगळुरू यांनी ‘ब्रेक फॉर ब्रेस्ट कॅन्सर’ या प्रेरणादायी विषयावर महिलांसाठी विशेष बाईकथॉनचे आयोजन केले. स्तन कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्ताने आयोजित या १२ किलोमीटरच्या बाईकथॉनमध्ये ३०० हून अधिक महिला रायडर्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा प्रवास एचसीजी कॅन्सर सेंटर येथून सुरू होऊन त्याच ठिकाणी संपला, ज्यामध्ये शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून महिलांनी ऐक्य, आरोग्य आणि सजगतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मनीषा कुमार, मुख्य संचालन अधिकारी – कर्नाटक, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस लिमिटेड आणि डॉ. स्मिता सल्दान्हा, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी, एचसीजी कॅन्सर सेंटर, बंगळुरू यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक करणे, नियमित स्व-परीक्षण करण्यास आणि वेळोवेळी तपासणीस प्रवृत्त करणे हा होता.
कार्यक्रमाच्या दरम्यान सर्व महिला रायडर्सना मोफत स्तन तपासणी आणि मॅमोग्रॅम चाचणी करून देण्यात आली. या उपक्रमाने एचसीजी रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेतील बांधिलकीचा आणि स्तन कर्करोगाच्या लवकर निदानाच्या महत्त्वाचा ठोस संदेश दिला. या बाईकथॉनला बायकर सेविअर्स बेंगळुरू, भारत ऑन व्हील्स तसेच इतर १६ नामांकित बाईकर्स क्लब्सनी सक्रिय सहकार्य दिले. महिलांच्या शक्ती, एकता आणि आरोग्याबद्दलच्या जनजागृतीचा हा उपक्रम एक प्रेरणादायी सोहळा ठरला.
स्तनाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार असून शहरीकरण, जीवनशैलीतील बदल आणि विलंबाने होणारे निदान ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.
या प्रसंगी मनीषा कुमार म्हणाल्या, स्तन कर्करोग जनजागृती महिन्याच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक फॉर ब्रेस्ट कॅन्सर’ हा केवळ एक प्रवास नाही, तर हा एक जनजागृतीचा आंदोलन आहे. महिलांना एकत्र आणून त्यांच्या आरोग्याबद्दल सजगता निर्माण करणे आणि स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी प्रेरित करणे हा आमचा उद्देश आहे. लवकर निदान म्हणजेच जीवन वाचविण्याची संधी. अशा उपक्रमांद्वारे एचसीजी महिलांमध्ये आत्मविश्वास, आशा आणि एकतेची भावना जागवू इच्छिते.”
डॉ. स्मिता सल्दान्हा यांनी सांगितले, दर ६० सेकंदांत जगभरातील चार महिलांना स्तन कर्करोगाचे निदान होते आणि त्यापैकी एक महिला आपला जीव गमावते. या आकडेवारीवरून परिस्थितीची गंभीरता लक्षात येते. या उपक्रमाद्वारे आम्ही केवळ जागरूकता निर्माण करत नाही, तर महिलांना मोफत तपासणी आणि मॅमोग्रॅमची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. नियमित स्व-परीक्षण, वेळेवर तपासणी आणि निरोगी जीवनशैली हे स्तन कर्करोगाचा धोका कमी करण्याचे प्रमुख उपाय आहेत.”