शिळगांवकडून स्वच्छता अभियान सप्ताहाला सुरुवात


श्री खरवलीआई सेवा ट्रस्टचा उपक्रम 

दिवा \ आरती परब : श्री खरवलीआई सेवा ट्रस्ट, शिळगांव यांच्या वतीने स्वच्छता अभियान सप्ताहाला काल सायंकाळी चार वाजता प्रारंभ करण्यात आला. हे स्वच्छता अभियान ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.


या अभियानांतर्गत दररोज दोन तास देऊन श्री खरवलीआई मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प ट्रस्टकडून करण्यात आला आहे. परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, प्लास्टिकमुक्त व व्यसनमुक्त वातावरण निर्माण करणे या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला आहे.


ट्रस्टचे सचिव शरद पाटील यांनी भाविकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या प्रकारे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे मंदिर परिसरात नवस फेडण्यासाठी येताना स्वच्छतेची जबाबदारीही पार पाडावी आणि अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ राहण्यासोबत भाविकांच्या आरोग्यालाही लाभ होईल.


या स्वच्छता अभियानाच्या सुरुवातीला कळवा- मुंब्रा वन विभागाचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, भाविक भक्त आणि ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post