सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई : मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुंबईतील मालाड पूर्व येथील पुष्पा पार्कजवळील हायवेवर धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण बस आगीत होरपळून पूर्णपणे जळून खाक झाली.
आग लागल्याचे लक्षात येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बस ताब्यात घेतली आहे. तसेच आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे काही काळ हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
