दिवा \ आरती परब : शिळ- दिवा रस्त्यावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा प्रभाग समितीच्या वतीने दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शिळ– दिवा रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तसेच महाकालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर वाहनांची वेगवान वर्दळ होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावर योग्य वेगमर्यादा दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक तसेच आवश्यक सूचनाफलक नसल्यामुळे वाहनचालकांना दिशा न मिळाल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचे सांगण्यात आले.
या मार्गावर शाळा व वस्ती असल्याने लहान विद्यार्थी, नागरिक व स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे महाकालेश्वर मंदिराजवळ, दिपक सर्विस सेंटर समोर, राॅबो स्कुल शंकर मंदिर समोर, चंद्रकांत आलिमकर घरा समोर, तुलाजा भवानी मंदिर शिळगांव प्रवेशद्वार समोर, सुभेदार स्कुल समोर या चार ठिकाणी तातडीने गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पथ व आवश्यक सूचनाफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
