ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नगरसेवक मुकेश मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या स्थानिक संघटनेत सक्रिय व संघटनात्मक कामात सातत्याने पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निवडीमुळे ठाण्यातील भाजप गटाला नवे बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोकाशी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे सांगितले. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, मनोहर डुंबरे, नारायण पवार, जयेंद्र कोळी तसेच सरचिटणीस सचिन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी मोकाशी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे शहरातील राजकीय घडामोडींमध्ये या निवडीकडे महत्त्वाच्या दृष्टीने पाहिले जात असून, आगामी काळात भाजप गटाची भूमिका अधिक आक्रमक व संघटित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

