मनसे नेते राजू पाटील यांचे प्रतिपादन
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत आमचे पाच नगरसेवक वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले असून सध्या महानगरपालिका मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. महापालिकेवर कर्जाचा भार असल्याने नगरसेवकांना प्रभागात विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे, असे मनसे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार जर सत्तेसोबत राहिलो, तर नगरविकास खात्याकडून काही प्रमाणात निधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कल्याण–डोंबिवलीतील जनतेने मनसेवर मोठ्या अपेक्षेने विश्वास दाखवून मतदान केले आहे. त्या मतदारांची कामे रखडू नयेत, विकासकामे मार्गी लागावीत, यासाठीच आम्ही शिंदे सेनेसह जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
हा निर्णय कोणत्याही पदासाठी नसून केवळ शहरातील विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
