कोल्हापूर \ शेखर धोंगडे : कोल्हापूर जिल्ह्यातील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, मुक्त सैनिक येथील क्रीडा शिक्षक तसेच राष्ट्रीय दर्जाचे कबड्डी प्रशिक्षक डॉ. राजेंद्र बनसोडे यांची सबज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी तांत्रिक समिती अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शाळा प्रशासन, सहकारी शिक्षक, कर्मचारी व कबड्डीप्रेमींमधून आनंद व्यक्त होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आळंदी (पुणे) येथे ही राष्ट्रीय सबज्युनिअर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ पुणे व अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातून एकूण ५४ मुलांचे व मुलींचे संघ सहभागी होणार असून राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी ए. उषा रेड्डी, अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नामदार गिरीश महाजन, जनरल सेक्रेटरी भारती जगताप यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेस उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बनसोडे यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. “डॉ. बनसोडे यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणपद्धती यामुळेच त्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे,” अशा शब्दांत शाळा व्यवस्थापनाने अभिमान व्यक्त केला.
