यंदा महापौरपदाची सर्व प्रवर्गांना संधी




महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत जाहीर


मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच सर्वसाधारण प्रवर्गांना संधी देण्यात आली आहे. यंदाच्या आरक्षणात महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले असून अनेक महापालिकांमध्ये महापौरपद महिला आरक्षित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर व अमरावती महापालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण देण्यात आले आहे. कल्याण–डोंबिवली महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले असून, ठाणे महापालिकेत अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर लातूर व जालना महापालिकेत अनुसूचित जाती (महिला) आरक्षण लागू करण्यात आले आहे.

कोल्हापूर, उल्हासनगर, पनवेल आणि इचलकरंजी महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यात आले असून, अकोला, चंद्रपूर, जळगाव आणि अहिल्यानगर येथे ओबीसी (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, नागपूर, बृहन्मुंबई, नाशिक यांसह अनेक महापालिकांमध्ये महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आगामी काळात महापौरपदासाठी कोणत्या पक्षाचा वरचष्मा राहतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post