कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ५२४ शाळांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



डोंबिवली :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या ०८ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या एकूण ५२४ शाळांमध्ये सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने प्रत्येक शाळेत देशभक्तीपर गीतांवर आधारित विद्यार्थ्यांच्या संगीतबद्ध सामूहिक कवायती, विद्यार्थ्यांची भाषणे, सामूहिक देशभक्तीपर गीते तसेच विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सीआरसी स्तरावर तसेच शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या कवायती घेण्यात आल्या असून, या कवायतींमध्ये रंगीत झेंडे, डंबेल्स, घुंगरुकाठी, लेझीम यांचा प्रथमच एकत्रित वापर करत विद्यार्थ्यांनी रोमहर्षक व शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.


प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरसी स्तरावर आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, समग्र शिक्षा अभियानाच्या प्रमुख जाधव तसेच सर्व विषयतज्ञ यांनी विविध शाळांना भेटी देऊन कार्यक्रमांची पाहणी केली. त्यांनी संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संगीतबद्ध कवायतींसह विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल शाळांचे कौतुक केले.

एकूणच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांमुळे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा झाला.





Post a Comment

Previous Post Next Post