हाऊसिंग डॉटकॉमचा १५ टियर-२ शहरांत विस्तार


मुंबई : भारतातील आघाडीचे रिअल इस्टेट अॅप हाऊसिंग डॉटकॉमने देशभरातील उच्च क्षमतेच्या १५ टियर-२ शहरांमध्ये धोरणात्मक विस्तार केल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा उद्देश झपाट्याने वाढणाऱ्या निवासी बाजारपेठांमध्ये कंपनीची उपस्थिती अधिक बळकट करणे आणि महानगरांच्या पलीकडे राहणाऱ्या घरखरेदीदारांना डिजिटल-फर्स्ट रिअल इस्टेट शोधाची सहज सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

या नव्या बाजारपेठांमध्ये आग्रा, संभाजीनगर, जबलपूर, जोधपूर, कानपूर, लुधियाना, मदुरई, मंगळूर, मथुरा, म्हैसूर, रांची, त्रिची, उदयपूर, वापी आणि विजायवाडा यांचा समावेश आहे. या विस्तारामुळे अधिक शहरांमधील नागरिकांना स्थानिक मालमत्तांचा शोध, सत्यापित लिस्टिंग, डेटा-आधारित माहिती तसेच परवडणाऱ्या घरांचे पर्याय सहज मिळणार आहेत.

गेल्या काही वर्षांत टियर-२ शहरे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विकास केंद्रे म्हणून पुढे येत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमधील गुंतवणूक, सुधारित कनेक्टिव्हिटी, औद्योगिक क्लस्टर्सचा विस्तार आणि तुलनेने कमी मालमत्ता दर यामुळे या शहरांमध्ये घरांसाठी मोठी मागणी वाढत आहे. त्याचवेळी, छोट्या शहरांतील ग्राहकही घर खरेदीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे अधिक वळत असल्याने विश्वसनीय डिजिटल सेवांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

या विस्ताराबाबत आरईए इंडिया (हाऊसिंग डॉटकॉम) चे सीईओ प्रवीण शर्मा म्हणाले, “भारतातील निवासी विकासाचा पुढचा टप्पा महानगरांच्या पलीकडे आकार घेत आहे. उभरत्या शहरांतील घरखरेदीदार ऑनलाइन शोधात सोय, विश्वासार्हता आणि पर्यायांना प्राधान्य देत आहेत. १५ टियर-२ शहरांत विस्तार करून हाऊसिंग डॉटकॉम अधिक समावेशक डिजिटल रिअल इस्टेट इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे.”

हाऊसिंग डॉटकॉमची मालक कंपनी आरईए इंडिया प्रा. लि. टेक्नॉलॉजी आणि डेटा प्लॅटफॉर्म्समध्ये सातत्याने गुंतवणूक करून भारताच्या डिजिटल रिअल इस्टेट इकोसिस्टमला अधिक सक्षम करत आहे. ऑनलाइन मालमत्ता शोध आणि ऑफलाइन व्यवहार यांची सांगड घालणाऱ्या स्केलेबल, टेक-सक्षम सोल्यूशन्स विकसित करण्याच्या दीर्घकालीन धोरणाशी हा विस्तार सुसंगत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post