नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून तालुक्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून, तिचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आतापर्यंत गंभीर रुग्णांना जिल्हा किंवा खासगी रुग्णालयात नेताना अडचणी येत होत्या. मात्र आता अपघात, प्रसूती व गंभीर आजारांच्या प्रसंगी तात्काळ उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या सुविधेमुळे शेतकरी, मजूर, गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनतेच्या हितासाठी पुढाकार घेणे हेच खरे लोकनेतृत्व असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विनोद बोरकर, डॉ. नितीन उराडे, प्रफुल खापर्डे, विजय गावंडे, जुनैद खान यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात अनेक जीव वाचविले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
