शरद पवार शिल्ड स्पर्धेत तुकाराम सुर्वे संघ विजेता

 


ठाणे : १९ वर्षाखालील शरद पवार शिल्ड (एसपीएस) २०२५–२६ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २ फेब्रुवारी रोजी कळवा येथील अनिरुद्ध क्रिकेट अकॅडमी येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत तुकाराम सुर्वे संघाने अंतिम विजेतेपद पटकावले.


समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र आव्हाड, जेएसडब्ल्यू स्पेशल ऑपरेशन्सचे संचालक रणजित पिल्ले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विघ्नेश कदम, अभय हडप, दीपक पाटील, विकी कळंबटे (प्रमोटर – विजय लक्ष्मी), राजू शिंदे, सौ. पूजा शिंदे-विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल रणजित पिल्ले यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.


बक्षीस वितरण सोहळ्यात अभय हडप यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील १९ वर्षाखालील खेळाडूंना ही स्पर्धा मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरत आहे. मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी ही स्पर्धा भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रणजित पिल्ले यांनीही उपस्थित खेळाडूंना भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.



मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाखालील निवड समितीचे निवडकर्ता रवी कुलकर्णी, प्रशांत सावंत आणि झुल्फीकार परकार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्पर्धेचा अंतिम सामना तुकाराम सुर्वे संघ आणि खंडू रांगणेकर संघ यांच्यात रंगला. चुरशीच्या लढतीत तुकाराम सुर्वे संघ विजयी ठरला. संघांच्या प्रशिक्षकांमध्ये अरुण यादव (तुकाराम सुर्वे संघ), प्रतिष भोईर (खंडू रांगणेकर संघ), स्वप्नील प्रधान (बापू चांदोरकर संघ) आणि विक्रम तोरवी (विजय शिर्के संघ) यांचा गौरव करण्यात आला.


वैयक्तिक कामगिरीत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रबंजित पाताडे (तुकाराम सुर्वे संघ), उत्कृष्ट फलंदाज म्हणून अमानत अरिफ हुसेन, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून वंश चुंबळे (विजय शिर्के संघ) यांची निवड करण्यात आली.


या स्पर्धेत माजी रणजी क्रिकेटपटूंच्या नावाने संघांना नावे देण्यात आली होती. त्या खेळाडूंच्या कुटुंबीयांना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. तसेच आयोजन समितीतील नंदकुमार दोनवळकर, दर्शन भोईर, केतन अयरे, विरेश तावडे, नीलम तावडे आणि इतर सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. ठाण्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना दिशा देणारा आणि स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा सोहळा क्रिकेटप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.



Post a Comment

Previous Post Next Post