जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज

 


सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेसाठी ११५ तर पंचायत समितीसाठी २४४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ५ लाख ६१ हजार १०५ असून त्यामध्ये २ लाख ८२ हजार ५८८ महिला२ लाख ७८ हजार ५१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

दरम्यान, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गस्त वाढविणे, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

मतदारांची ओळख पटविण्यासाठी न मिटणाऱ्या शाईचा वापर करण्यात येणार आहे. आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहेत. mahasecvoterlist.in आणि Matadhikar अॅपद्वारे मतदारांना आपली नावे शोधता येणार आहेत. मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास प्रचार थांबविण्यात येणार असून जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन समिती तसेच निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. खर्च नियंत्रण समिती व कॅश रिलीज समितीही गठीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण ८७० मतदान केंद्रांपैकी ८१० केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदार यादीसाठी १ जुलै २०२५ रोजीची अधिप्रमाणित यादी वापरण्यात येणार आहे. दुबार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून राज्य निवडणूक आयोगाच्या २९ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

निवडणुकीसाठी १३२ क्षेत्रीय दंडाधिकारी, ८९१ केंद्राध्यक्ष, प्रत्येकी ८९१ मतदान अधिकारी (०१, ०२ व ०३), ८७२ शिपाई८७२ व्यवस्थापक अशी एकूण ५,४४० कर्मचारी संख्या तैनात करण्यात आली आहे. याशिवाय ८ निवडणूक निर्णय अधिकारी, १६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी२ निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदानासाठी ८१० कंट्रोल युनिट्स (४८० राखीव)८१० बॅलेट युनिट्स (१,१६२ राखीव) उपलब्ध आहेत. सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण २४ व ३१ जानेवारी २०२६ रोजी पूर्ण झाले असून तिसरे प्रशिक्षण ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. एफएसटी, व्हीएसटी पथकांसह सर्व नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे.

मतमोजणीचा आराखडा पूर्ण झाला असून मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी २ व ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील ६७६ इमारतींमध्ये ८१० मतदान केंद्रे असून त्यापैकी ५५३ इमारतींमध्ये एक केंद्र, ११२ इमारतींमध्ये दोन केंद्रे११ इमारतींमध्ये तीन केंद्रे आहेत. ७० शॅडो एरिया केंद्रे, १,००० पेक्षा अधिक मतदार असलेली ८६ केंद्रे आहेत. मतदार यादी चिठ्ठी वाटप ७८ टक्के (४,४२,०४२) पूर्ण झाले आहे. मतदान केंद्रावर ६,३१२ अधिकारी-कर्मचारी, १३४ क्षेत्रीय अधिकारी, ८१० बीएलओ८९१ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संवेदनशील केंद्रांची संख्या शून्य आहे. प्रत्येक मतदान केंद्राजवळ वैद्यकीय सुविधा कक्ष व क्रेच सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक तालुक्यात २ जलद कृती दल, १३४ जीप, ११६ बस२ मिनी बस तैनात करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत ८१० मतदान केंद्रांवर किटचे वाटप होणार आहे. तसेच ८ तालुक्यांत ८ सखी मतदान केंद्रे८ आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post