ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बनावट परफ्यूम विक्रीचा धक्कादायक प्रकार

 


ठाणे :  ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बनावट व मुदत संपलेल्या परफ्यूमची विक्री करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या समाजकंटक विक्रेत्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, यापूर्वी एका तरुणीचा पाठलाग केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. अशाच स्वरूपाचा आणखी एक गंभीर प्रकार आज दुपारी सॅटीस पुलाजवळ उघडकीस आला. या प्रकाराविरोधात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संजय वाघुले यांनी तीव्र आवाज उठवला आहे.

गावदेवी मैदानालगतच्या एका दुकानातील कामगाराला काही परफ्यूम विक्रेत्यांनी १०० रुपयांत तीन परफ्यूम देण्याचे आमिष दाखवले. पैसे दिल्यानंतर मात्र चौघा जणांनी त्याला धमकावत पुन्हा ५०० रुपये मागितले आणि ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून एकूण १,८०० रुपये उकळले. या प्रकाराची माहिती मिळताच कार्यकर्त्यांसह तातडीने रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेतली असता संबंधित विक्रेते पळून गेले; मात्र त्यांच्या ताब्यातील बनावट व मुदतबाह्य परफ्यूमचा साठा नष्ट करण्यात आला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना नगरसेवक संजय वाघुले यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असतानाही पोलीस, रेल्वे पोलीस, महापालिका व रेल्वे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर नौपाडा व ठाणे नगर पोलीस, महापालिका आयुक्त आणि रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करून बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार असून, येत्या महापालिकेच्या महासभेतही हा गंभीर मुद्दा ठामपणे मांडला जाणार असल्याचे संजय वाघुले यांनी स्पष्ट केले.




Post a Comment

Previous Post Next Post