कुरुक्षेत्रात महाराष्ट्राची परंपरा कायम, इतिहासात नवा अध्याय

 


३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत 

अपर्णा वर्देला ‘इला पुरस्कार’, देशातील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान

हरियाणा : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे झालेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद पटकावत सलग आठवे अजिंक्यपद मिळवून सुवर्णइतिहास रचला. या स्पर्धेत देशातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा ‘इला पुरस्कार’ महाराष्ट्रच्या अपर्णा वर्देने, तर ‘भरत पुरस्कार’ ओडिसाच्या सत्या राजन बेहरने पटकावला. सलग नऊ वेळा अजिंक्यपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या किशोर संघाला यंदा मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

हरियाणातील थीम पार्क मैदानावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानवर एक डाव व १२ गुणांनी (२७–१५) दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच आक्रमणात महाराष्ट्राने १७ गुणांची (२४–७) निर्णायक आघाडी घेतल्याने सामना पूर्णतः एकतर्फी ठरला. महाराष्ट्राकडून राही पाटील (२.१० मि. संरक्षण व २ गुण), वेदिका तामखेडे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), अपर्णा वर्दे (२.३५ मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (१.५० मि. संरक्षण) आणि पियुशा परमाळकर (१.४५ मि. संरक्षण) यांनी भक्कम कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. राजस्थानकडून तुलसी (१.४० मि. संरक्षण), गुंजन (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) आणि राधिका (४ गुण) यांनी प्रतिकार केला; मात्र महाराष्ट्राच्या वेगवान खेळापुढे तो अपुरा ठरला.

किशोर गटाच्या अंतिम सामन्यात ओडिसाने कोल्हापूरवर एक डाव ७ गुणांनी (३१–२४) मात करत अजिंक्यपद पटकावले. ओडिसाकडून सत्यरंजन (२, १ मि. संरक्षण व ८ गुण), चिन्मय अम्रिता (१.१०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण) आणि अमरज्योती (१.१०, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळ साकारला. कोल्हापूरकडून देवराज येड्राव (६ गुण) आणि गौरव माने (८ गुण) यांनी झुंज दिली; मात्र विजय ओडिसाच्याच पारड्यात गेला.

याआधी किशोर गटाच्या उपांत्य फेरीत ओडिसाने महाराष्ट्रावर ५ गुणांनी (३०–२५) विजय मिळवत अंतिम फेरीचा मार्ग मोकळा केला. मध्यंतराला महाराष्ट्राकडे ५ गुणांची आघाडी होती; मात्र दुसऱ्या डावात ओडिसाच्या आक्रमक खेळामुळे सामना त्यांच्या बाजूने झुकला. ओडिसाकडून सत्या (१.१०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) आणि चिन्मय (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी निर्णायक खेळी केली, तर महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.४०, २ मि. संरक्षण व २ गुण) आणि कर्तव्य गादेकर (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी लढत दिली. या पराभवानंतर महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

किशोरी गट :

• उत्कृष्ट संरक्षक : राही पाटील (महाराष्ट्र)
• उत्कृष्ट आक्रमक : गुंजन (राजस्थान)
• इला पुरस्कार व अष्टपैलू खेळाडू : अपर्णा वर्दे (महाराष्ट्र)

किशोर गट :

• उत्कृष्ट संरक्षक : वरद पोळ (महाराष्ट्र)
• उत्कृष्ट आक्रमक : गौरव माने (कोल्हापूर)
• भरत पुरस्कार व अष्टपैलू खेळाडू : सत्या राजन बेहर (ओडिसा)




Post a Comment

Previous Post Next Post