उपमहापौरपदी राहुल दामले यांची बिनविरोध निवड
कल्याण-डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेला मंगळवारी औपचारिक सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी पालिका आयुक्त अभिनय गोयल आणि सचिव किशोर शेळके उपस्थित होते.
निवड प्रक्रियेदरम्यान सुरुवातीला अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
त्याअनुषंगाने महापौरपदी शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली थवील यांची, तर उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
नवीन महापौर आणि उपमहापौर यांच्याकडून शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासोबतच विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून नागरिकाभिमुख निर्णय घेतले जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

