कल्याण-डोंबिवली : शिक्षण विभाग योजना कार्यालय पुणे यांच्या नियोजनानुसार दि. २९ मार्च रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २०९ परीक्षा केंद्रांवर ‘नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत विशेष परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
असाध्य ते साध्य करिता सायास या उक्तीप्रमाणे, आयुष्यातील एका टप्प्यावर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी ही परीक्षा स्वावलंबनाकडे नेणारे महत्त्वाचे पाऊल ठरली. या परीक्षेत १०५७ महिला आणि १९८ पुरुष, अशा एकूण १२५५ नवसाक्षर नागरिकांनी सहभाग नोंदवला. प्रश्नपत्रिकेमध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या मूलभूत कौशल्यांवर आधारित व्यावहारिक प्रश्नांचा समावेश होता. परीक्षार्थींमध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून आला, ज्यामुळे या अभियानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले.
परीक्षार्थ्यांचे स्वागत शाळांमध्ये पुष्प देऊन आणि फलकांवर प्रेरणादायी संदेश लिहून करण्यात आले. वयाची मर्यादा विसरून हातात पेन घेतलेले हे नागरिक समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. परीक्षेपूर्वी शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना सीआरसी प्रमुखांद्वारे सूचना व माहिती पुस्तिका पाठवण्यात आल्या होत्या. परीक्षा कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली.
ऑनलाईन माहिती व्यवस्थापनाचे काम विलास लिखार, युवराज महाले, सरदार सर आणि संतोष पाटील यांनी पाहिले. या अभियानाचा उद्देश केवळ वाचन-लेखनापुरता मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर बनवणे आणि मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. भारत बोरनारे (प्रशासन अधिकारी) आणि विजय सरकटे (शिक्षणाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
नवभारत साक्षरता अभियान हा केवळ उपक्रम नसून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे ‘साक्षर भारत, समर्थ भारत’ या ध्येयाकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. उपस्थित सर्व नवसाक्षर नागरिक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
