महापौर दिपमाला काळे यांच्या हस्ते गुढीपूजनणण
जळगाव : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याचा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर दिपमाला काळे यांच्या हस्ते मनपा मुख्य प्रांगणात विधीवत गुढीपूजन करून गुढीची स्थापना करण्यात आली.
गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करत सकारात्मकता, विजय आणि समृद्धीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, सभागृह नेते नितीन लढ्ढा, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
गुढीपूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची विशेष स्वच्छता करून त्यांना आदरांजली वाहण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सोहळ्यानिमित्त संपूर्ण मनपा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभागी झाले.
दरम्यान, गुढीपाडवा ते महानगरपालिका स्थापना दिन असा दुहेरी उत्सव जळगावकरांना अनुभवता यावा यासाठी १९ ते २१ मार्च दरम्यान मनपा इमारत आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीचे जतन आणि महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे महापौर काळे यांनी सांगितले.


