आंबेडकरी समाजाची प्रशासनाकडे मागणी
दिवा \ आरती परब : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिवा परिसरात त्यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाची घोषणा १४ एप्रिल रोजी करावी, अशी जोरदार मागणी आंबेडकरी अनुयायांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वातावरण तापले असून, नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या मागणीसाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही काळापासून सातत्याने प्रयत्न करत असून, प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने यंदाही केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सौरव आढांगळे यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णाकृती स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.”
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन १४ एप्रिल या पवित्र दिवशीच स्मारकाबाबत ठोस घोषणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दिव्यातील आंबेडकरी समाज व नागरिक यंदा तरी या मागणीला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त करत असून, आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpeg)