धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा

 


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मागणी

मुंबई :  NEET-UG 2026 परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले की, या पेपरफुटीमुळे सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्य धोक्यात आले असून लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेली आहे. तरीही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

धर्मेंद्र प्रधान यांचा अहंकार आणि सत्तेतील आसक्ती यामुळेच ते पद सोडण्यास तयार नसल्याचा आरोप करत, “ही भूमिका त्यांच्या मंत्रिपदाच्या खुर्चीशी असलेल्या आसक्तीचे प्रतीक आहे,” असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

तसेच, NEET परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ही परीक्षा UPSC कडे सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली. परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी व्यापक सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“NEET प्रक्रियेत सुधारणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. कारण 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे,” असे ठाम मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, NEET-UG ही देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची अत्यंत महत्त्वाची प्रवेश परीक्षा असून, या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post