शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्याची ३९५ विद्यार्थी पात्र

 


ठाणे :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक (PUP) व इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक (PSS) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या अंतरिम निकालात ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, जिल्ह्यातील एकूण ३९५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ५०१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४६७० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले आणि त्यातून ३८४ विद्यार्थी पात्र ठरले. यामध्ये शहापूर तालुका २५६ विद्यार्थ्यांसह जिल्ह्यात प्रथम ठरला. तर मुरबाड तालुक्यातील ६७, भिवंडीतील ३४, कल्याणमधील १६ आणि अंबरनाथमधील ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील ६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६१५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले असून ११ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील ८, मुरबाडमधील २ आणि अंबरनाथमधील १ विद्यार्थी यशस्वी झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले.

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, अतिरिक्त तासिका, सराव परीक्षा, पालकांचे सहकार्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, प्रश्नसंच आणि सराव परीक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या.

जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

“शिष्यवृत्ती परीक्षेतील ठाणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी प्रेरणादायी आहे. ‘शहापूर पॅटर्न’ पद्धतीने ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, मिशन भरारी, NMMS आणि नवोदय शिष्यवृत्ती परीक्षांसाठीही विशेष नियोजन करण्यात येणार आहे,” असे रणजित यादव यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post