पाटकर विद्यालयाचा अनोखा उपक्रम
डोंबिवली / शंकर जाधव : शहरातील आयईएस चंद्रकांत पाटकर विद्यालयात सीनिअर केजी अर्थात बालवर्गातील मुलांचा आगळावेगळा दीक्षांत समारंभ आणि आशीर्वाद सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
पूर्व प्राथमिक विभागाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून प्राथमिक विभागात प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या सीनिअर केजी आणि बालवर्गातील चिमुकल्यांसाठी आशीर्वाद सोहळा साजरा केला गेला. रामरक्षेतल्या ‘शिरो मे राघवः पातू पासून विजयी विनयी भवेत’ या अर्थपूर्ण श्लोकांनी मुलांवर अक्षता व पुष्पवर्षाव करून त्यांना पुढील शिक्षणासाठी आशीर्वाद देण्यात आले. दीक्षांत समारंभसाठी मुले पारंपरिक वेशात उपरणं, टोपी घालून तर मुली परकर पोलका, उपरणं, टोपी घालून सजून आल्या होत्या. ज्या वर्गशिक्षिकेने आणि संगीत, चित्रकला, हस्तकला ह्या खास विषय शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि आपुलकीने सगळ्या विषयांची ओळख करून दिली आणि त्या त्या विषयाचे ज्ञान दिले. विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन हा आगळावेगळा दीक्षांत समारंभ पार पडला. पुरी, भाजी, जिलेबी आणि आईस्क्रीमने सोहळ्याची सांगता झाली.
मुख्याध्यापिका सुमेधा नवाथे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ह्यांच्या कल्पनेतून समारंभ साकारला गेला.