कृत्रिम घरटे वाटप
डोंबिवलीत / शंकर जाधव : चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली.या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २०१० सालापासून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला. जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.डोंबिवलीतील चिमणी प्रेमी शैलेश भगत हे गेली अनेक वर्ष 'चिमणी बचाव' जनजागृती करत आहेत. यासाठी त्यांनी नागरिकांना आपल्या घराच्या बालकनीत कृत्रिम घरटे लावण्याची विनंती केली आहे.डोंबिवलीत पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर नागरिकांना चिमणी घरटे वाटप केले.
याबाबत चिमणी प्रेमी शैलेश भगत म्हणाले, डोंबिवलीत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही.आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय, हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली.डोंबिवलीत चिमण्याचे घरटे लाव्ण्यासाठी अनेकजन माझ्याकडे चौकशी करतअसतात.यावरून डोंबिवलीकर चिमणीप्रेमी आहेत हे दिसून येते.