ठाणे : कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा अर्थसंकल्प तसेच भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.
सन 2022- 2023 चा सुधारित 4235 कोटी 83 लक्ष रूपयांचा तर सन 2023-2024 सालचा 4,370 कोटी रूपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर करीत मंजूर केला.ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणा-या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.
महसुली उत्पन्न वाढीकडे लक्ष ठेवुन कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसणारा यंदाचा हा काटकसरीचा वास्तव अर्थसंकल्प आहे. शहराला स्वतंत्र धरणासाठी कोणतीही तरतुद केलेली नसली तरी शहरातील स्वच्छता आणि आरोग्यावर भर देण्यात आला आहे. राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक ‘ठाणेदार’ विराजमान झाल्यानंतर ठाण्याच्या विकासालाही चालना मिळाली असुन याचे प्रतिबिंब ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात उमटले आहे. या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात ” मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना” राबवण्याचे पालिकेने ठरवले आहे. या अंतर्गत सुदृढ बालक – सुदृढ माता हा हेतु अभिप्रेत ठेवला असुन यासाठी तब्बल २५ कोटींची तरतुद अर्थसंकल्पात आहे. महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर भिस्त ठेवली आहे. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन,
प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन, तसेच कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.