मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा

 

                                               

डोंबिवली / शंकर जाधव : महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे. सुरू आर्थिक वर्षातील वीजबिलाचे १३८ कोटी रुपये अजूनही वसूल होणे बाकी आहेत. ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सुरक्षित असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पुढील तीन दिवसांत अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळ आणि ग्राहकांसाठीच्या मोबाईल अ‍ॅपवर सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील वीजबिले पाहण्यासह ते भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट ॲपच्या माध्यमातून सुलभ व सुरक्षितपणे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ही सुविधा नि:शुल्क असून ऑनलाईन पेमेंटवर वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

कल्याण मंडल एकमध्ये (कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली) ४ लाख ३२ हजार ६७२ ग्राहकांनी ६७ कोटी ५३ लाख रुपये ऑनलाईन भरले असून १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. कल्याण मंडल दोनमधील (उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड) ३ लाख ९१ हजार ७५९ ग्राहकांनी ७१ कोटी ४६ लाख भरले असून ७१ कोटी ८१ लाखांची थकबाकी आहे. वसई मंडलातील (वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे) ५ लाख ९२ हजार ३५५ ग्राहकांनी ११९ कोटी १७ लाख भरले असून २५ कोटी ६१ लाखांची थकबाकी आहे. तर पालघर मंडलमध्ये (पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी) १ लाख ६८ हजार ९२२ ग्राहकांनी ३० कोटी ३३ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला असून ३० कोटी २३ लाखांची थकबाकी वसूल होणे अजूनही बाकी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post