डोंबिवली / शंकर जाधव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार असून कल्याण डोंबिवलीत ३ व ४ तारखेला यात्रा काढण्यात येणार आहे.नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणारअसल्याचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
डोंबिवली विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदकुमार जोशी, जिल्हा सरचिटणीस संजीव बिडवाडकर उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले, राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा - शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती,
या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे असेही शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
( यात्रेचे विभागवार प्रमुख : मुंबईसाठी आ. अमित साटम, ठाणे -कोकण - आ. निरंजन डावखरे, आ.नितेश राणे, पश्चिम महाराष्ट्र : प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर, उत्तर महाराष्ट्र : आ. जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मराठवाडा : आ. संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, पूर्व विदर्भ : आ. प्रवीण दटके, आ. विजय रहांगडाले, पश्चिम विदर्भ : आ. संजय कुटे, प्रदेश महामंत्री आ. रणधीर सावरकर )