वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आनंद झाला असता

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केली

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या ९०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. ठाणे जिल्ह्याचा आरोग्यविषयक अनुशेष भरून काढणारे सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित पाहिलेले हे एक स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान यावेळी व्यक्त केले.

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे आणि या सिव्हील हॉस्पिटलचे एक अतूट नाते होते. अनेकदा गरीब, गरजू लोकांसाठी ते आपला शब्द टाकायचे, रात्री अपरात्री येऊन अपघातग्रस्त रुग्णांची भेट घ्यायचे. आजच्या या निर्णयामुळे त्यांना नक्की आनंद झाला असता अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

दिघे साहेबांच्या काळात जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणांहून आलेल्या रुग्णाबद्दल दिघे साहेबांना माहिती मिळताच, आलेल्या प्रत्येक रुग्णाची दिघे साहेब स्वत: प्रत्यक्ष येऊन विचारपूस करत असत. त्यांना काही अडचणी असल्या तर ते त्याचवेळी त्या अडचणींचे निरासन करत. त्यामुळे या रुग्णालयाचे नुतनीकरण करणे, अत्याधुनिक करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे.

 ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

या भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा रुग्णालयासाठी जागा देणाऱ्या विठ्ठल सायन्ना यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.कैलास पवार आणि जिल्हा रुग्णालयात रुग्णांना अहोरात्र मदत करण्यासाठी सदैव तत्पर असलेले माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सोयीसुविधा इथेच उपलब्ध व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात येत होती. आज या रुग्णालयाचे भूमिपूजन झाल्याने त्या दिशेने पहिले सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेस उत्तम आरोग्यसुविधा देणे हे आपल्या सरकारचे कर्तव्य असून त्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

नवीन बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ ६ लाख ८१ हजार ३९७.४० स्वे.फूट आहे. मुख्य इमारत (Block-A) यामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय बेसमेंट २ + बेसमेंट १ + तळ मजला + १० मजले एअर रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यात एक परिचारीका प्रशिक्षण केंद्र इमारत आहे. ही इमारत १० मजली असून यामध्ये बैठक कक्ष, ३०० प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण वर्ग, तळमजल्यावर भोजनकक्ष इ. सुविधाउपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर वसतीगृहाची सोय उपलब्धकरुन देण्यात येणार आहे. मुख्य इमारतीच्या मागील बाजूस वाहनतळ, तळ मजला + ६ मजले क्षमतेचा असून इमारतीच्या छतावर सौरउर्जातंत्र बसविण्यात येणार आहे. रुग्णालयाची नवीन इमारत (Block-A) व नर्सिंग प्रशिक्षण केंद्र ( Block-B) या दोन्ही इमारतींना सातव्या मजल्यावर पूलाव्दारे जोडण्यात आले आहे. इमारतीमध्ये १४ उद्वाहन, ११ आधुनिक आय.सी.यु. (एकूण ११७ खाटा), १५ ओ.टी., इ. सर्व अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयात सौर उर्जेद्वारे निर्माण केलेल्या वीजेचा वापर करण्यात येणार आहे. २०० खाटांच्या सुपरस्पेशालीटी विभागामध्ये कार्डीओलॉजी, न्युरोलॉजी, ऑनकॉलॉजी आणि नेफ्रॉलॉजी या प्रमाणे अत्याधुनिक साधनसामुग्रीसह सुविधा उपलब्ध होणार आहेत. ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेरियाटीक वॉर्ड, मेडिकल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड, इएनटीसह, ऑर्थोपेडीक वॉर्ड, ट्रामा केअर युनिट, इन्टेन्सिव्ह केअर युनिट, आयसोलेशन वॉर्ड, बर्न वॉर्ड, आय वॉर्ड व शस्त्रक्रियागृह, टीबी आणि चेस्ट वॉर्ड, एसएनसीयु वॉर्ड, एनआरसी वॉर्ड, सायकॅट्रिक वॉर्ड, प्रिंझनर वॉर्ड, हिमॅटॉलॉजी वॉर्ड याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

२०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये प्रसुतीपूर्व/प्रसुतीपश्चात/प्रसुती कक्ष तसेच इक्लॅम्पशिया कक्ष, तसेच प्रसुती वॉर्ड व बालरुग्ण वॉर्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा रुग्णालयात ब्रेन, हार्ट, किडनी सर्जरी, अत्याधुनिक डायलिसीस, कार्डियाक न्युक्लिअर मेडिसीन, रेडिओथेरपी, केमोथेरपी, अत्याधुनिक प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मातामृत्यु दर कमी करण्यासाठी आधुनीक आय.सी.यु. व नवजात बालकांसाठी आधुनिक एन.आय.सी.यु. उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर अद्ययावत एमआरआय, सी.टी. स्कॅन, एक्स-रे, लॅब सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन पीएसए प्लांट, लिक्वीड ऑक्सिजन प्लांट, जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन सेंट्रल लाईन इ. सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्याचा वापर भविष्यात करण्यात येईल. ठाणे जिल्हा रुग्णालय हे ठाणे जिल्हयातील एकमेव मोठे शासकीय रुग्णालय असून लगतचे पालघर व रायगड जिल्हयातील रुग्ण येथे उपचारार्थ येत असतात. याठिकाणी सुपरस्पेशालिटी रुग्णालय झाल्यास ठाणे, पालघर, रायगड येथील गोर, गरीब, गरजू, आदिवासी रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई येथे स्थलांतरीत करावे लागणार नाही.



Post a Comment

Previous Post Next Post