डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण रेल्वे पुलावर एका गर्दुल्ल्याने एका तरुणीला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.या घटनेने महिला प्रवासी असुरक्षित असल्याचे दिसून आले.रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिस प्रवाशांची सुरक्षा करण्यास कमी पडल्याचे हे उदाहरण असून आता मनसेने यासंदर्भात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलले आहे.मनसेने कल्याण रेल्वे स्थानकात गर्दुल्ले आणि भिकारी यांना हटविले.प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबधित रेल्वे अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची व सकाळी ड्युटीवर असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करत मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे प्रबधकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर आंदोलन करत स्टेशन परिसरातील गर्दुल्ल्यांना हाकलून लावले. यावेळी स्टेशन परिसरात झोपलेल्या गर्दुल्ल्यांना पोलिसांनी फटकावले. यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास तसेच स्टेशन परिसर १५ दिवसात गर्दुल्ले मुक्त न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिला.
अनेक वर्षांपासून कल्याण रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याचे दिसते. ही वास्तविकता रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांना माहीत असून कल्याण रेल्वे स्थानक व परिसर गर्दुल्ले मुक्त करू शकले नाही.महिला प्रवाशाला गर्दुल्ल्याने मिठी मारल्याची घटना घडल्याने प्रशासना जरी जागे झाले नसले तरी मनसेने मात्र कल्याण रेल्वे स्थानक व परिसर गर्दुल्ले आणि भिकारी मुक्त करण्याचे ठरविले.या घटने नंतर मनसे आक्रमक झाली असून मनसेने रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबधित रेल्वे अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची व सकाळी ड्युटीवर असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करत मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे प्रबधकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रेल्वेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तर मनसे महिला कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांन बांगड्या देत 'कामे करायची नसतील तर बांगड्या भरा' असे सुनावले. आंदोलयाबाबत भोईर म्हणाले, पुढील १५ दिवसात रेल्वे स्थानक परिसर रेल्वेने गर्दुल्ले आणि फेरीवाला मुक्त करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.
डोंबिवली रेल्वे स्थानक व परिसर गर्दुल्ले व भिकारीमुक्त कधी होणार ?
कल्याण रेल्वे पुलावरील घटनेनंतरही बिवली रेल्वे स्थानक व परिसरात गर्दुल्ले आणि भिकारी हटविण्यास रेल्वे पोलीस गांभीर्याने घेत नाहीत.कल्याण प्रमाणे डोंबिवली रेल्वे स्थानक व परिसरात अशी घटना घडल्यानंतरच रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल जागे होणार आहे का असा प्रश्न प्रवासी करत आहेत.