मुंबई, : जैवविविधता आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यांचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्टपणे आढळून येत आहेत. विकासाची गती कायम राखण्यामध्ये तसेच लोककल्याण आणि समृद्धीला चालना देण्याच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याबरोबरच संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रयत्नांद्वारे हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी या परस्पर संबंधित समस्यांवर जी 20 देशांनी एकत्रितपणे लक्ष देणे गरजेचे आहे, असे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी सांगितले.
जी 20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे उद्घाटनपर भाषण झाले. मंत्री कपिल पाटील यांनी कार्यगटाने हवामान बदल आणि पर्यावरण समस्या या क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले. समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या भव्य यशाबद्दल तसेच ओशन 20 संवाद मधील अर्थपूर्ण चर्चेबद्दल त्यांनी कार्यगटाचे अभिनंदन केले.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, भारताचे जी 20 अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतीभिमुख धोरणाबद्दल वचनबद्ध आहे,” यानुसार हा कार्यगट संकल्पना आधारित प्राधान्यक्रमांमध्ये अर्थपूर्ण परिणाम साधण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी ग्रामीण समुदायांना सहभागी करून घेण्याच्या महत्त्वाकडे लक्ष वेधून श्री पाटील म्हणाले की, “शाश्वत विकास साधण्यासाठी आपण केवळ शहरी केंद्रांवरच नव्हे तर आपल्या ग्रामीण समुदायांचे कल्याण आणि प्रगतीकडेही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागाला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. पावसाचे बदलते स्वरूप, दुष्काळ आणि पाण्याची टंचाई, उष्णतेची लाट, वाढते तापमान आणि लहरी हवामानामुळे ग्रामीण समुदायांची उपजीविका , अन्न सुरक्षा आणि आरोग्यासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणे ही ग्रामीण भागाची जीवनपद्धती आहे. भारत एक राष्ट्र म्हणून पारंपरिकपणे शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी ओळखला जातो. ही परंपरा कायम राखत पंचायती राज संस्था नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना चालना देत असून ग्रामीण समुदायांना वनीकरण मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि जलस्रोतांचे संवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायती राज मंत्रालय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाची प्रक्रिया राबवत आहे. यासाठी, ‘समग्र -सरकार’ आणि ‘समग्र -समाज’ दृष्टिकोनातून वेगवेगळ्या हितधारकांना एका मंचावर एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सांगून त्यांनी व्हायब्रंट व्हिलेज असेंबली उपक्रम आणि पंचायतींना दिले जात असलेले प्रोत्साहन याची माहिती दिली.